आदिवासी कुटुंबाकडून न्यायाची मागणी
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
साईनगर येथील गट क्रमांक 3 ई/ 26 /1 या स्वतःच्या मालकीच्या जमिनीतून अनधिकृतपणे माती उत्खनन करून विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा गंभीर आरोप वाशिवली ठाकूरवाडी येथील मंगेश लहू वाघ यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन येथील वाशिवली सजेचे तलाटी शभम शेगोकर यांनी तात्काळ स्थळ पाहणी करून संबंधित अहवाल खालापूर तहसिल कार्यालयास पाठविला आहे.
वाशिवली गावातील संबंधित व्यक्ती कोणताही अधिकृत माती उत्खनन परवाना नसताना आदिवासी कुटुंबाला दमदाटी करून त्यांच्या मालकीच्या जमिनीमधून मातीचे उत्खनन करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. तसेच, उत्खनन केलेली माती विक्रीसाठी नेली जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. मंगेश वाघ यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, “आम्ही आदिवासी असल्याने आमच्याशी कोणतीही चर्चा न करता आमच्याच जमिनीमध्ये हस्तक्षेप करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीने त्यांच्या जमिनीचा खासगी सर्व्हे करून घेतला असून, त्या सर्व्हेबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. याशिवाय संबंधित खासगी सर्व्हे करून निश्चित करण्यात आलेल्या हद्दींवरही त्यांनी आक्षेप घेतला असून, या हद्दी मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी मंगेश वाघ यांनी प्रशासनाकडे केली आहे. या तक्रारीमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
