पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीतील गेली अनेक वर्षे अनागोंदी कारभार सुरू आहे. मात्र, आता ग्रामपंचायत प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची परवानगी न घेता पाणी पुरवठा विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी नळजोडणी करून दिली होती. त्या नळजोडणींबाबत आक्षेप घेण्यात आल्यानंतर त्या नळजोडण्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून कापून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे नेरळ ग्रामपंचायतीकडून निलंबन करण्यात आले आहे.
नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार प्रशासक राजवटी पासून सुरू होता. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी नंतर ग्रामपंचायत कारभारात सुसूत्रतता आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी 43 नळजोडण्या बेकायदा देण्यात आल्याचे उघड करून त्या सर्व नळजोडण्या कापून टाकल्या होत्या. त्यानंतर आणखी एक प्रकरण सामाजिक कार्यकर्ते ऋषभ लोहकरे यांनी समोर आणले होते.
नेरळ गावातील चिंचआळी परिसरातील पुष्कर अपार्टमेंट येथे ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी न घेता दोन नळजोडण्या पाणी पुरवठा विभागाने जोडून दिल्या होत्या. कोणतीही अधिकृत वर्क ऑर्डर नसताना आणि ग्रामपंचायतीची देणगी पावती बनवून घेतली नसल्याने या नळजोडणी बाबत संशय निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीमध्ये त्या नळजोडणींबाबत आक्षेप घेतल्यानंतर त्या दोन्ही नळजोडण्या संबंधित दोन कर्मचाऱ्यांनी पुन्हा कापून टाकल्या आणि विषय बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दि.3 जून रोजी पाणी पुरवठा विभागाच्या त्या दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. त्यावेळी केवळ नळजोडणी टाकण्याचे काम नव्हते, तर प्रत्यक्ष नळ कनेक्शन देण्यात आले असल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकरणाची चर्चा सुरू होताच या नळजोडणीबाबत त्या दोन कर्मचाऱ्यांनी दिलेला खुलासा हा समाधानकारक नव्हता. शेवटी नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी (दि.22) पाणी पुरवठा विभागाच्या त्या बेकायदा नळजोडणींबाबत 10 दिवसांसाठी निलंबित केले. ग्रामपंचायत प्रशासकांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
