मान्सून वेळेवर परतल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती
| रायगड | खास प्रतिनिधी |
हवामान विभागाचे पावसाबाबत ‘योग्य प्रिडिक्शन’ येत नसल्याने पिकांच्या ‘प्रॉडक्शन’बद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. मान्सून उशिरा आला आणि त्याला परतण्यास उशीर झाला तर पिकांसाठी चांगले आहे. मात्र, तो वेळेवर परतल्यास ते अतिशय अडचणीचे ठरु शकते, अशी भीती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी ‘कृषीवली’शी बोलताना व्यक्त केली.
रायगड जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर भाताचे पीक घेतले जाते. यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने जिल्ह्यातील भाताचे पीक धोक्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 95 टक्के क्षेत्रावर भात पेरणी झाली असली तरी बेभरवशाच्या पावसामुळे फक्त 15 टक्के क्षेत्रावरच भातलावणी होऊ शकली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा भाताचे उत्पादन घटून पीक उशिराने हातात येण्याची शक्यता आहे. भातलागवडीसाठी 99 हजार 835 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. भातलागवडीबरोबरच 2903 हेक्टरवर नाचणी लागवड करणायचे नियोजन करण्यात आले आहे. नाचणीची 76 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 474 हेक्टरवर वरई लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. वरईलागवडीसाठी 23 टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आले आहे.
राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना उशिरा सुरुवात करावी लागली आहे. सध्या जेवढा पाऊस झाला आहे, त्यामध्ये लावणीची कामे सुरु आहेत. मात्र, पावसाने दांडी मारल्यास पीक करपण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शेतीची कामे उशिराने सुरु झाल्याने उत्पादन हातात येण्यास सहाजिकच विलंब होणार आहे. हवामान विभागाकडून पावसाबाबत योग्य प्रिडिक्शन होत नसल्याने भाताच्या प्रॉडक्शनबाबत सांगणे धाडसाचे ठरणार आहे. पावसाबाबतचे अंदाज आधीच समजले असते तर शेतकऱ्यांना कमी कालावधीत तयार होणारे बियाणे दिले गेले असते. परंतु, आता हातातून वेळ गेली आहे. शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा काढता येणार आहे. अद्यापपर्यंत फक्त आठ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा काढला आहे. सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. किमान 50 हजार शेतकऱ्यांनी विमा घेणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे बाणखेले यांनी स्पष्ट केले. पाऊस उशिरा दाखल झाला तसा तो उशिराने परतला तर पिकासाठी काही प्रमाणात समाधानाची बाब ठरणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हवामान विभागाकडून पावसाबाबत योग्य प्रिडिक्शन होत नसल्याने भाताच्या प्रॉडक्शनबाबत सांगणे धाडसाचे ठरणार आहे. पावसाबाबतचे अंदाज आधीच समजले असते तर शेतकऱ्यांना कमी कालावधीत तयार होणारे बियाणे दिले गेले असते. परंतु, आता हातातून वेळ गेली आहे.
उज्वला बाणखेले, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी