। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोयंजे रेल्वे विभाग यांच्याकडून रेल्वे पोल क्रमांक 75/1 व 75/2 दरम्यान, मोठे भिंगार गावाजवळ एका अनोळखी पुरुषास रेल्वेची धडक लागल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अंदाजे 35 वर्षीय अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अनंता हारगुडे करीत आहेत.
रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
