कर्जतमधील शेतकऱ्यांची अनोखी शेती

एक एकरातून पाच टन कोहळ्याचे उत्पन्न

| नेरळ | वार्ताहर |

शेती हीच आपली माय समजत तिच्यात काळानुरूप बदल करत प्रयोगशील शेतकरी म्हणून अरुण वेहले या शेतकऱ्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. कर्जत तालुक्यातील माले या भागात वेहले राहतात. यांचे वडील देखील शेतीच करायचे. त्यावेळी भातशेती यातून उत्पन्न जास्त मिळत नसल्याने ते जोडशेती म्हणून टोमॅटोची शेती करायचे पण त्यातून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती होती. त्यामुळे वयाने लहान असलेल्या यांना हि गोष्ट खटकली. त्यांनी वडिलांसोबत आपली पारंपरिक शेती सांभाळली. मात्र यासोबत भाजीपाला शेती त्यांनी सुरूच ठेवली. एका बाजूला भातशेती करताना त्यात वेगवेगळे बियाणे लागवड करताना दुसऱ्या बाजूला दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ अशी भाजी लागवड त्यांनी केली. तर वेगळे काहीतरी लागवड करण्याचा विचार करत असताना त्यांनी बहुगुणी कोहळ्याचे पीक घेण्याचे ठरवले. सात वर्षांपूर्वी त्यांनी कोहळ्याची लागवड केली.

साधारण एक एकर जागेत यांनी कोहळ्याच्या पिकाची लागवड केली आणि त्या शेतीत पाच टन असे विक्रमी उत्पन्न मिळत असून त्यातून सुमारे दीड लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. दिवाळी दसरा हा कोहळ्याचा हंगाम असतो. त्यामुळे या हंगामात तयार झालेल्या फळातून त्यांना एक ते दीड लाख एवढे उत्पन्न मिळते. कोहळ्याला बाजरात गेल्यावर दलाल अडते यांच्याकडून 15 ते 20 रूपयेच भाव येतो. तर बाजरात कोहळ्याची किरकोळ विक्री हि 100 रुपयांच्यावर होते. बाजारात किंमत कमी येत असल्याने या कोहळ्यावर प्रक्रिया करून ते विक्री करण्याचा मानस यांनी बोलून दाखवला आहे.

कोहळा प्रक्रिया उद्योगासाठी जिल्ह्यातून कोणी शेतकरी पुढे आले नाहीत त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण होऊ शकले नाही. मात्र प्रशिक्षण होऊन वेहले यांनी इतर शेतकऱ्यांपुढे कोहळा शेतीचा आदर्श निर्माण करावा यासाठी कृषी विभाग त्यांच्या सोबत आहे.

ए.बी. गायकवाड, प्रभारी तालुका कृषी अधिकारी कर्जत
Exit mobile version