वेळंब पांगारीदरम्यान विनापरवाना वृक्षतोड

वन विभाग निद्रिस्त; चौकशीची मागणी

| गुहागर | प्रतिनिधी |

वेळंबफाटा-आबलोली मार्गावर वेळंब पांगारीदरम्यान विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित तोड व्यापाऱ्याला नवीन वृक्षलागवडीबाबत माहिती देण्यासाठी बोलवले असतानाही त्या व्यापाऱ्याने त्यांना ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे वृक्षतोडीवरुन व्यापारी आणि वन विभाग यांच्यात जुंपल्याचे दिसून येत आहे.

गुहागर तालुका अलिकडे वृक्षतोडीने भकास होत आहे. महामार्गालगतच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असते. मोठी अवजड वाहने लाकूड भरुन वाहतूक सुरु असते. खुलेआम ही वृक्षतोड सुरु असून डोंगर भकास होत आहेत. वेळंब पांगारी दरम्यान, रस्त्यालगत ऐन पावसाळ्यात ही तोड होत आहे. वन विभागाकडे याबाबत चौकशी केली असता, या व्यापाऱ्याला आम्ही वृक्षलागवडीसंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावल्याचे सांगितले मात्र, अद्याप त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे वनपाल यांनी सांगितले.

दरम्यान, या वृक्षतोडीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असून अजूनही येथे तोड सुरु आहे. वन विभाग यावर काय कारवाई करते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, राज्य सरकार वृक्षलागवडीला प्रोत्साहन देऊन उपक्रम राबविण्यासाठी मदतही करत आहे. ज्या ठिकाणी वृक्षतोड होते तेथे संबंधित तोड व्यापाऱ्याकडून वृक्षलागवड करणे गरजेचे असते; मात्र, अनेक व्यापारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडून केवळ वृक्षतोडीवरच भर दिला जात असल्याचे समोर येत आहे.

Exit mobile version