मातृत्वाला काळिमा! पोटच्या गोळ्याला टाकले कचऱ्यात

। मुंबई । प्रतिनिधी ।

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात एका 19 वर्षीय अविवाहित तरुणीने स्वच्छतागृहात अकाली बाळाला जन्म दिल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. त्या तरुणीने नंतर नवजात बाळाला कचरापेटीत टाकले. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून कर्मचाऱ्यांनी त्याचा जीव वाचवला. सध्या नवजातावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, तरुणीवर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी पोटदुखीची तक्रार घेऊन अपघात व आपत्कालीन विभागात दाखल झाली. नोंदणी केल्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली. तेथेच तिने अकाली बाळाला जन्म दिला आणि त्याला कचरापेटीत टाकले. स्वच्छतागृहातून रडण्याचा आवाज येऊ लागल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संशय आला. संबंधित तरुणीने आतून दरवाजा बंद केल्याने दरवाजा उघडण्यात अडचण येत होती. दरम्यान, दरवाजा उघडल्यानंतर नवजात बाळ कचरापेटीत आढळले. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला त्वरित व्ही. एन. देसाई रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी मेडिको-लीगल केस दाखल करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात जोगेश्वरी पोलिसांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे.

Exit mobile version