| पेण | प्रतिनिधी |
शुक्रवारी (दि.04) झालेल्या अवकाळी पावसाने विदयुत महावितरण कंपनीचे पितळ उघडे केले असून, पेण तालुक्यातील ग्रामीण विभागात जवळपास 56 पोल पाच मिनिटाच्या वार्याने कोलमडून पडले. तर 14 पोल हे तालुक्यात इतर ठिकाणी पडले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पाच मिनिटांचा वारा आणि दहा मिनिटांचा पाऊस यामध्ये ग्रामीण विभागाचे 56 पोल पडतात. यावरून ठेकेदार काम करत असलेला दर्जा समोर येत आहे.
आजच्या घडीला विदयुत महावितरण कंपनी स्वतःचे कामगार भरती न करता ठेका पध्दतीमध्ये सर्व काम करत आहेत. निसर्गचक्री वादळानंतर पेण तालुक्यातील जवळपास 80 टक्के विजेचे पोल बदलले होते. परंतु, काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अशा तक्रारी वारंवार झाल्या आहेत. मात्र, अधिकारी वर्गाने या बाबीकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले. कारण अधिकारी वर्गदेखील लक्ष्मी दर्शनाला भुलल्याने ठेकेदार काय करतो, कशा पध्दतीचे काम करतो याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या पाच मिनिटाच्या साध्या वार्याने एकूण 70 पोल कोलमडून पडले. त्यामुळे 24 तास उलटून गेले तरी काही भागात वीज पूर्ववत झालेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे विदयूत महावितरणचे कारभार अधिकारी वर्गांपेक्षा ठेकेदारच चालवतात असे बोलल्यास वावगे ठरणार नाही. आधीच्या अधिकारी वर्गाने केलेली घोडचूक आत्ताचे अधिकारी निस्तारत आहेत. परंतु, त्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे.
या विषयी पेण विदयूत महावितरण शाखेचे उपअभियंता एस.एन.खोबरागडे यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी सांगितले की, पेण तालुक्यात 70 पोल पडले असून जवळपास 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले आहे. तर ग्रामीण विभागाचे ज्युनियर इंजिनिअर एस.एस.शिंदे यांनी सांगितले की, माझ्या विभागामध्ये 25 ते 30 लाखांचे नुकसान झाले आहे, 56 पोल पडले आहेत. कित्येक ठिकाणी ताराही तुटल्या आहेत. एकंदरीत काय तर ठेकेदाराने दर्जेदार काम न केल्याचा फटका वीज ग्राहकांबरोबर सरकारी तिजोरीला बसला आहे.