| रायगड | प्रतिनिधी |
आठवडाभरापासून राज्यातील विविध भागांत पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली आहे. या पावसाचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून भाजीपाल्यासह फळांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी रायगड जिल्ह्यात होणाऱ्या फळ आणि भाजीपाल्याच्या आवकवरही परिणाम होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. भाज्यांची अवाक घटल्याने भाजी मंडईमध्ये फळ आणि पालेभाजीचा भाव वधारला आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला भाजीपाला पाण्यात भिजून गेला आहे. तर हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांकडून तयार असलेला माल बाजारात आणण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे सध्या बाजारात आवक वाढली असल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.
पण पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने भविष्यात भाजीपाल्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती फळांच्या बाबतीतही आहे. फळांच्या बागा ही पाण्याखाली गेल्या आहेत. अलिबाग, पेण, माणगाव आणि कर्जत तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील बाजारात भाजीपाला येत असतो. मात्र अवकाळी पाऊस मोठया प्रमाणात झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोकणातील हापूस आंब्याला मोहोर येत आहे. तर, काही झाडांना मोहोर पकडला होता. मात्र, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंब्याला आलेला मोहोर गळून पडला आहे. त्याचा परिणाम फेब्रुवारी, मार्चमध्ये येणाऱ्या आंब्यावर होणार आहे. पाऊस नसताना शेतकऱ्याने मेहनत करून पाणी आणून बागा जगवल्या आहेत; मात्र आता बागा तयार झालेल्या असताना अवकाळी पावसाने हजेरी लावून मेहनतीवर पाणी सोडले. यामुळे मुंबईला येणाऱ्या भाजीपाला तसेच फळांच्या किमतींवर येत्या काळात परिणाम पाहायला मिळेल.
निलेश उतेकर,
फळ बागायतदार