| मुंबई | प्रतिनिधी ।
राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत आहेत. कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहचले असताना आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात यंदा फेब्रुवारीच्या मध्यान्हपासूनच ऊन तापायला सुरुवात झाली. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली. विदर्भात अकोला जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर हवामान खात्यानेही विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. मात्र, आता हवामानात पुन्हा एकदा बदल होत आहे.
भर उन्हाळ्यात आता हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होताना दिसला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा वर्तवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.
शुक्रवार आणि शनिवारी (दि.13, 14 ) विदर्भासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 मार्च रोजी यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर 14 मार्च रोजी, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचे येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, नांदेड, बीड, परभणी येथे अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी लातूर धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच जोरदार वारेही यादरम्यान वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या दक्षिण भागात लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोकणात उष्णता अधिक वाढेल आणि उष्ण वातावरण अधिक राहण्याचा अंदाज आहे. काही भागात आजही पारा 40 च्या पार जाण्याची शक्यता आहे.
राज्यावर अवकाळीचेही सावट
