| पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार तास पुणे, साताऱ्यासह रायगड, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार तास राज्यात जोरदार वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांसाठी पुढील 4 तासांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, रायगड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि 50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे जोरदार वारे अपेक्षित आहेत. दुसरीकडे, जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि धाराशिव या जिल्ह्यांतही विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागांत वाऱ्याचा वेग 40 किमी प्रतितास राहील. हवामान खात्याने या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.