| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरालगतच्या बांधकाम साइटवर काम करणाऱ्या एका कामगाराचा तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.14) दुपारी घडली. श्रीचंद मुनीराज पासवान (46) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेतील मृत कामगाराला कंत्राटदाराकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही साधने पुरविण्यात आली नसल्यामुळे त्याचा खाली पडून मृत्यू झाल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी या घटनेला जबाबदार धरून बांधकाम कंत्राटदार व कामगार कंत्राटदार या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत श्रीचंद मुनीराज पासवान हा पनवेलमधील विरूपाक्ष मंदिरालगतच्या सिद्धीविनायक सोसायटीच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर काम करत होता. तसेच तो त्याच ठिकाणी राहण्यास होता. बुधवारी दुपारी12 वाजण्याच्या सुमारास श्रीचंद तिसऱ्या माळ्यावर काम करत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधने व कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आढळून आले. त्यामुळेच श्रीचंद पासवान या कामगाराचा तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी बांधकाम कंत्राटदार इरफान दादुमिया पटेल व कामगार कंत्राटदार मोहम्मद शफिकुल इस्लाम या दोघांविरोधात निष्काळजीचा गुन्हा दाखल केला आहे.