15 मे रोजीचा धडक मोर्चा रद्द करण्याची एमआयडीसीची विनंती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरात सिनारमन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पुर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. या विरोधात सत्ताधारी पक्षाच्याच जिल्हाप्रमुखाने आवाज उठविला होता. अखेर खारेपाट विभागातील शेतकरी संघटनेच्या शेतकर्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. या संपुर्ण निविदा प्रक्रिया रद्द करुन नव्याने शेतकर्यांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचबरोबर कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील 28 गावांना फिल्टर पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाला एमआयडीसीने तात्काळ प्रशासकीय मान्यता देत 15 मे रोजी एमआयडीसी कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा रद्द करावा, अशी लेखी विनंती केली. त्यानुसार हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कुसुंबळे विभागातून जिल्ह्यातील मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना पाण्याची पाईपलाईन जात असताना येथील नागरिक पाण्यापासून वंचित होते. येथील हजारो नागरिकांना न्याय मिळवून देताना एमआयडीसीकडून फिल्टर प्लँटच्या कामाला तात्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकर्यांच्या जमीनीतून सिनारमन्स कंपनीसाठी पाईपलाईन जात आहे, त्या शेतकर्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आले नव्हते. शेतकर्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणार्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाच्या भूमिकेलाच या शेतकर्यांनी विरोध दर्शविला होता. यासाठी शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष तसेच सदस्यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत प्रशासनाने केलेल्या यशस्वी चर्चेनंतर खारेपाट विभागात उत्साहाचे वातावरण आहे. धेरंड-शहापुर येथील सिनारमन्स प्रकल्पासाठी एकरी 96 लाख 69 हजार तर हेक्टरी 2 कोटी 41 लाखांचा दर देऊ केला आहे. तर ज्यांच्या जमीनीतून ही पाईप लाईन जाणार आहे त्या शेतकर्यांशी एक शब्दाची चर्चाही एमआयडीसीच्या अधिकार्यांनी केली नाही. या विरोधात येथील शेतकर्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पाईपलाईनमुळे शेतकर्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा डाव असल्याचे म्हणणे शेतकर्यांचे आहे. अधिकार्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर शेतकर्यांनी 15 मे रोजीचा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली.
प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत 736 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या 28 किलोमीटर लांबीची भली मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी 167 कोटी 8 लाख 25 हजार 254 रुपये खर्चुन पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे 189 कोटी 70 लाख 35 हजार 326 रुपये खर्चुन जॅकवेल बांधली जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया पुर्ण केली. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येत असल्याचे कार्यकारी अभियंता संजय ननवरे यांनी सांगितले.