गीतकार-संगीतकार “प्रशांत म्हात्रे” यांची रचना
| पेण | प्रतिनिधी |
तालुक्यातील “पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित अनुदानित माध्यमिक रानपाखरं आश्रमशाळा-वरप”, या आदीवासी आश्रमशाळेत दि.१३ रोजी आयोजित “जल्लोष रानपाखरांचा” या आदीवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमात गीतकार-संगीतकार “प्रशांत म्हात्रे” यांनी लिहिलेल्या व संगीत बद्ध केलेल्या “रानपाखरं” या आदीवासी आश्रमशाळेवर आधारीत गाण्याचे मान्यवरांच्या हस्ते पोस्टर ओपनिंग करून अनावरण करण्यात आले.
विशेष म्हणजे हे गाणं याच आदीवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी मनीषा पारधी, रुपाली दोरे, दिप घुमे, गोविंद दोरे, संजना दोरे, स्वप्नाली वारगुडे, भावना शिद, श्रेया हंबीर,साक्षी पारधी, रुपाली दोरे आणि सुप्रसिद्ध गायक व गाण्याचे गीतकार-संगीतकार प्रशांत म्हात्रे यांनी मिळून गायले आहे. तर या गाण्याचे संगीत संयोजन श्री.आशुतोष पोटे यांनी केले आहे.
“या आदीवासी विद्यार्थ्यांना या गाण्याच्या माध्यमातून प्रथमच प्रोफेशनल म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये जाण्याची संधी मिळाली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा न घाबरता आत्मविश्वासाने व अतिशय सुरात हे गाणं गायलं आहे”, असे गीतकार प्रशांत म्हात्रे यांनी यावेळी म्हटले.
रानातील पाखरे म्हणजे हि आदीवासी मुले या आश्रमशाळेरुपी घरट्यात येऊन शिकतात आणि ज्ञानाचे बळ पंखात भरून गगनाला गवसणी घालण्यास सज्ज होतात, अश्याप्रकाराचा आदीवासी मुलांना शाळेचे महत्त्व पटवून देणारा महत्वाचा संदेश या गाण्यातून देण्यात आला आहे. या प्रसंगी श्री. गणेश मनवे-सरपंच वरप ग्रामपंचायत, रानपाखरं शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक श्री. संजय नाईक, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. कुंदा नाईक, श्री. भिकाजी नाईक, सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री जुईली पाटील-म्हात्रे, सौ. सपना शिर्के, श्री.ज्ञानेश्वर शिर्के, श्री.पांडुरंग दोरे, सौ.शोभा दोरे, सौ. श्वेता उघडा, मनिषा पारधी इत्यादी मान्यवर आणि आश्रमशाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.