| उरण | प्रतिनिधी |
गेल्या काही महिन्यांपासून उरणमधील 400 कोटींहून अधिक रकमेचा चिटफंड घोटाळा गाजत आहे. नुकताच या प्रकरणातील अटकेत असलेल्या सुप्रिया पाटील व तिच्या सहकाऱ्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तर हजेरीच्या अटीवर जामिनावर सुटल्यानंतर फरार झालेल्या सतीश गावंड याचाही जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. या दोन्ही प्रकरणात दोन हजारांहून अधिकांची फसवणूक झाली असल्याचे समजते.
चिटफंड चालविणाऱ्या दोन गटांवर तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून दोन हजार गुंतवणूकदारांची 400 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी सुप्रिया पाटील, जगन्नाथ ठाकूर, हितेश कडू, अक्षय कोळी व प्रणय ठाकूर अटकेत आहेत, तर फोहन कोळेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. तसेच सतीश गावंड हा फरार झाला आहे.
गेली अनेक महिन्यांपासून उरणमध्ये हा चिटफंड घोटाळा सुरू असताना याकडे राजकीय पक्ष, नेतेमंडळी, सामाजिक संघटना, पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. अखेर एकमेकांच्या कटकारस्थानामुळे हे प्रकरण उघड होऊन गुन्हे दाखल झाले आहेत. सतीश गावंड हा काही दिवसात रक्कम दामदुप्पट करून देत असल्याने या भागात देवमाणूस म्हणून परिचित होता. त्याची वाढती प्रसिद्धी पाहून त्याला व सुप्रियाला राजकीय पाठबळ मिळू लागले. या चिटफंड प्रकरणात राजकीय, प्रतिष्ठित व पोलिसांनीही आमिषाला भुलून पैसे गुंतविले असल्याचे समजते.
चिटफंड प्रकरणातील सुप्रिया पाटील अटकेत आहे, तर देवमाणूस सतीश गावंड फरार आहे. त्यातील सुप्रियाचा जामीन अर्ज फेटाळला तर सतीश गावंड याचा जामीन रद्द करण्यात आला आहे. परंतु ठेवीदारांना रक्कम परत मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. रक्कम जर परत मिळाली नाही तर ते आपल्या जीवाचे बरेवाईट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सतीश गावंड हा जरी फरार झाला असला तरी तो व्हिडीओ व्हायरल करून अनेकांवर बेताल आरोप करीत आहे. तरीही त्याचा थांगपत्ता लागत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.