उरण करंजा एसटी सेवा सुरु

। उरण । वार्ताहर ।
द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यांकरिता उरण एसटी डेपोतून सकाळी 10 वाजता करंजा करिता बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी उरण आगाराचे व्यवस्थापक जुईकर, भुंडे, विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, व्हा.चेअरमन के.एल.कोळी, मुख्याध्यापक ए.टी.पाटील, पालक, विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
सदर सेवेचा लाभ चारफाटा, डाऊर नगर, मुळेखंड, गणेश नगर, चाणजे येथील विद्यार्थ्यांना होणार आहे. यावेळी चेअरमन सिताराम नाखवा यांनी डेपो व्यवस्थापक जुईकर यांना विनंती केली की, एसटीची सेवा करंजा नाक्यापर्यंत झाली तर ग्रामस्थ व प्रवासी यांना सुद्धा एसटीचा लाभ घेता येईल. एसटी फिरण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास ही सेवा करंजा धक्यापर्यंत सुरु करता येईल. सध्या तरी कस्टम चाळीपर्यंत एसटी बस सुरू राहणार आहे. तरी या सेवेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा.

Exit mobile version