ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी

बायपास अनेक वर्षे धूळ खात; प्रशासन कागदी नियोजनात अडकून

| उरण | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाच्या उत्साहाला यंदा वाहतूक कोंडीचे विघ्न लागले आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत वाढलेली गर्दी आणि गणेशोत्सवानिमित्त घराकडे निघालेल्या भाविकांची वाढलेली वर्दळ यामुळे उरण शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यातच उरण बायपास अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यामुळे उपलब्ध पर्यायी मार्गाचा उपयोग करून घेण्याची संधी असतानाही प्रशासन केवळ कागदी नियोजनात अडकून राहणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

उरणमध्ये गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी वाढली होती. तसेच, गणेशोत्सवानिमित्त घराकडे निघालेल्या भाविकांची वाढलेली वर्दळ यामुळे उरण शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. गणेशोत्सव काळात या गर्दीत आणखी भर पडणार असल्याने उरणकरांच्या संयमाची परीक्षा घेणारी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे नागरिक कोंडीत अक्षरशः अडकून पडत असताना दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला उरण बायपास धूळ खात पडला आहे. उपलब्ध पर्यायी मार्गाचा उपयोग करून घेण्याची संधी असतानाही प्रशासन केवळ कागदी नियोजनात अडकून राहणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. उरण-कोटनाका पेट्रोल पंप परिसरातून सुरू होणारा बायपास बोरी नाका परिसरात जोडला जाणार आहे. कोटनाका येथून उड्डाणपुलाचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून, बोरी येथील साईमंदिराच्या बाजूला वाहनांना खाली उतरता येण्याजोगी व्यवस्था तयार झालेली आहे. मात्र, पुढील काही अंतरातील काम आणि नगरपारीषद हद्दीतील जमीनविषयक वादामुळे हा मार्ग अद्याप पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलाच्या मध्यभागी असलेल्या गॅपवर आवश्यक तांत्रिक तपासणी करून तात्पुरते पॅचवर्क केले, तर गणेशोत्सवापुरता दुचाकी आणि छोट्या चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग खुला करता येणे शक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने याचा तातडीने विचार करणे गरजेचे आहे. हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास उरण शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहनांचा ताण कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते. विशेषतः बोरी, मोरा, नागाव आणि केगाव परिसरातील नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर येतो. नियोजनाच्या बैठका होतात, वाहतूक व्यवस्थेचे आराखडे तयार होतात; मात्र, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्यावर परिस्थिती जैसे थेच राहते. त्यामुळे यंदा तरी “बैठका नकोत, प्रत्यक्ष पर्याय द्या,” अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. गणेशोत्सवाच्या काही दिवसांसाठी हा मार्ग सुरक्षिततेच्या सर्व आवश्यक उपाययोजनांसह खुला करता येतो का, याची तातडीने पाहणी करून निर्णय घेण्याची मागणी उरणचे सामाजिक कार्यकर्ते घन:श्याम कडू यांनी केली आहे.

तात्पुरत्या मार्गाची गरज
गणेशोत्सव हा सण आनंदाचा असतो; वाहतूक कोंडीच्या ससेहोलपटीचा नाही. त्यामुळे बायपासचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडवून ठेवण्याऐवजी निदान गणेशोत्सवापुरता तरी तात्पुरता पर्याय उपलब्ध करून देण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीत उरण शहर वाहतूक कोंडीत ठप्प होण्यापूर्वी प्रशासनाने उपलब्ध पर्यायी मार्गाचा तात्पुरता वापर करण्याचा निर्णय घ्यावा. बायपासचा कायमस्वरूपी प्रश्न नंतर सोडवता येईल; मात्र, सध्या नागरिकांना कोंडीत अडकवून ठेवण्यापेक्षा सुरक्षित तात्पुरता मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे,” अशी भूमिका घन:श्याम कडू यांनी मांडली आहे. त्यामुळे आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.
Exit mobile version