दूषित पाणीपुरवठ्यामुळे उरणकर त्रस्त

अनेकांना आजारांनी ग्रासले

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील अनेकांच्या घरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी गढूळ व दूषित येत आहे. या दूषित पाण्यामुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभाग, एमआयडीसीच्या पाणी पुरवठा अभियंत्यांनी, रायगड जिल्हा परिषद आणि तालुका वैद्यकीय अधिकारी वर्गाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

उरण तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाळ्यात ही पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अनेक जलवाहिन्या या गटारातून जातात. त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाणी हे जलवाहिन्यामधून नळाला येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून उरण पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटासह इतर अनेक गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे, पाणीपुरवठा कमिटीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या समस्येकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने या दूषित पाण्यामुळे कुटुंबातील विशेषतः लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या दूषित पाण्यावरच नागरिकांना दिवस ढकलावे लागत आहेत. एकंदरीत दूषित पाणी पाण्यामुळे गंभीर जलजन्य आजार होत असल्याने अनेक रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी दाखल होत असल्याचे दिसून येत आहेत.

एकंदरीत पाणीपुरवठा कमिटी तसेच प्रशासन हे नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे आता या समस्येची दखल जिल्हा तसेच तालुका प्रशासन घेते का, हे पहावे लागेल.

Exit mobile version