। चिरनेर । प्रतिनिधी ।
जेएनपीए पोर्ट आणि त्यावर आधारित असलेल्या चार पोर्टमधून एकाच वेळी प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक बाहेर पडत असते. तसेच पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव आणि दुर्लक्षामुळे उरणच्या रस्त्याने वाहतूक कोंडीचा उच्चांक गाठला आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी नागरिकांना तब्बल दोन-दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. प्रशासनाने या वाहतूक कोंडीतून प्रवासी नागरिकांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
याबाबत कारवाई केली जाते. परंतु पोलीस गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे होते. या अनाधिकृत यार्डची परवानगी स्थानिक प्रशासनाने रद्द केली पाहिजे. यासाठी जेएनपीएसोबत अनेक बैठका घेऊनही परिस्थितीत फरक पडलेला दिसत नाही. या जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिक प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर तातडीने प्रशासनाने ठोस उपायोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
उरण वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे यांनीही हे कबूल केले आहे की, पोर्टमधून एकाच वेळी वाहतूक होते. त्याचबरोबर 25% वाहतूक वाढल्याने पोलिसांवर ताण पडत आहे. अनाधिकृत यार्डची वाहने रस्त्यावर उभी असतात. पार्किंग व्यवस्थेचा अभाव आणि रस्त्यावर वाहने उभी करणे, जेएनपीए बंदरातून एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने सुटतात. रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. एखादे अवजड वाहन खड्ड्यात अडकल्यास मार्ग बंद होतो आणि कोंडी वाढते.
गव्हाण फाटा येथे रेल्वे पूल बंद असल्याने दिघोडा चिर्ले या एकाच मार्गावरून वाहतूक वळते. ज्यामुळे तीन ते चार किलोमीटरच्या रांगा लागतात. अनाधिकृत गोदामांचा सुळसुळाट येथे पाहायला मिळतो. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अनेक अनधिकृत गोदामे आणि एमटी यार्ड परिसरात बसले आहेत. त्यामुळे ही मोठी वाहतूक कोंडी वाढली आहे. परंतु, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. उरण वाहतुकीचा पसारा मोठा असताना त्या तुलनेत पोलिसांची कमतरता भासत आहे. रात्रीच्या वेळी पोलीस नसल्यामुळे वाहन चालक बेधडकपणे आडवी तिडवी वाहने लावतात. त्यामुळेही वाहतूक कोंडी अधिक वाढते.







