| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो व उरण लोकल सेवेपैकी नवी मुंबई मेट्रो सेवा उद्घाटनशिवाय प्रवाशांच्या दिमतीला सुरू करण्याचे सौजन्य राज्य सरकारने दाखवले. त्यातच आता उरण लोकल सेवा सुरू करून उलवा, द्रोणागिरी, उरण परिसरात राहणाऱ्यांचा प्रवास सुकर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई मेट्रो सेवेचा प्रारंभ झाला असला, तरी या मेट्रो सेवेचे लोकार्पण होणे बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो सेवेचे लोकार्पण करण्याचा मानस राज्य शासनाचा असल्यानेच कोणताही गाजावाजा न करता व उद्घाटनाचे कोणतेही सोपस्कार पार न पाडता सदर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. त्यातच नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्गावरील बहुप्रतीक्षित उरणपर्यंतचा शेवटचा टप्पा लवकरच खुला होण्याचे संकेत मिळत आहेत. या मार्गाचे लोकार्पण करण्याच्या अनुषंगाने उरण लोकल रेल्वे सेवा सज्ज असूनदेखील 8 महिन्यांचा कालावधी लोटला आहे; परंतु उद्घाटनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना वेळच मिळत नसल्यामुळे या लोकल सेवेचे उद्घाटन रखडले आहे. विशेष म्हणजे रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी 4 मार्च रोजी या मार्गाची पाहणी केली होती; तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी 18 मार्च रोजी उरण रेल्वे मार्गाला भेट देऊन पाहणी केली. तेव्हापासून उरण लोकलसेवा कधी सुरू होते, यांची नवी मुंबईकर चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
पहिला टप्पा 2018 मध्ये सुरू सुमारे 27 कि.मी. लांबीच्या नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्गातील नेरूळ-बेलापूर ते खारकोपरपर्यंतचा 12 किलोमीटरचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता. तेव्हापासून नेरूळ-बेलापूर ते खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू आहे. या लोकल सेवेचा उलवे, गव्हाणपाडा, खारकोपर आदी परिसरातील नागरिकांना फायदा होत आहे; मात्र त्यापुढील उरण लोकलसेवेची अद्याप प्रतीक्षाच आहे.
प्रकल्पाचा दोन तृतीयांश खर्च सिडकोकडून नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कनेक्टिव्हिटीसाठी खूप महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा नेरूळ-बेलापूर ते उरण रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे प्रशासन सिडकोसोबत संयुक्तपणे करीत आहे. या प्रकल्पातील एकूण खर्चापैकी दोन तृतीयांश खर्च सिडको; तर एक तृतीयांश खर्च रेल्वे करीत आहे.