उरणकरांचे रेल्वेचे स्वप्न साकार होणार

भूसंपादन प्रक्रिया पूर्ण; मार्गाच्या कामाला वेग

| उरण । वार्ताहर ।

अनेक वर्षांपासून रखडलेल्या उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या रेल्वे मार्गादरम्यान शेतजमिनी संपादन करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. शेतकर्‍यांचा विरोध मावळला असून, रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अडथळेही दूर झाले आहेत. दुसरीकडे उरण स्थानकाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे उरणकरांचे रेल्वेचे स्वप्न साकार होणार आहे.

नेरूळ ते उरण रेल्वे मार्गामधील नेरूळ ते खारकोपर हा पहिला टप्पा पूर्ण होऊन पाच वर्षे उलटली आहेत. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर खारकोपर ते उरण हा 14 किलोमीटरचा टप्पाही लगेच पूर्ण होईल, अशी अपेक्षा उरणकरांना होती. मात्र, खारकोपर ते उरण या 14 किलोमीटरच्या टप्प्यात वनविभागाची आणि शेतकर्‍यांना भूसंपादनाची प्रकिया पूर्ण झाली नव्हती. त्यातच जमीन संपादनाला शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे रूळ टाकणे आणि इतर कामांचा वेग मंदावला होता. आता ती प्रकिया पूर्ण झाली आहे. मधल्या काळात जासई येथील शेतकर्‍यांनी साडेबारा टक्क्याला सिडकोच्या विलंबामुळे काम बंद केले होते. मात्र, पोलिस बंदोबस्तात हे कामही सुरू ठेवले गेले. आता रेल्वेच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. रेल्वेकडे ट्रॅक टाकण्याचे तंत्र नव्याने आले आहे. त्यामुळे उरणपासून 260 मीटरची ट्रॅक या तंत्राद्वारे टाकले जात आहे.

रांजणपाडा येथील जुने ट्रॅक बदलून नवीन टेक्नॉलॉजीने टाकण्यात आले आहे. तसेच, उरणच्या स्थानकाचेही काम प्रगतिपथावर आले आहे. दिल्लीतून आलेल्या आदेशामुळे हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून जानेवारी 2023 ला कार्यन्वित करण्यात येणार आहे.

पैसे, वेळेची बचत
उरण-खारकोपर या रेल्वे मार्गामुळे उरण, द्रोणागिरी नोडच्या रहिवासी वसाहतीमध्ये वाढ होणार आहे. येथून अन्य शहरात जाणारे नोकर वर्ग आणि रहिवाशांची पैशांची आणि वेळेची बचत होणार आहे. व्यापार्‍याला चालना मिळणार आहे. मच्छिविक्रेत्यांनाही नवी मुंबई, पनवेल; तसेच मुंबईत जाण्यासाठी या रेल्वेचा फायदा होणार आहे.

Exit mobile version