वाहतूक कोंडीच्या त्रासाने नागरिक हैराण; आरटीओ, पोलीस यंत्रणेकडे कारवाईची मागणी
। उरण । वार्ताहर ।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणि जे.एन.पी.ए. बंदराच्या सहकार्याने उरणच्या वाहतुकीला आता ऐस पैस रस्ते उपलब्ध झाले आहेत. या रस्त्यांवरून आता वाहने सुसाट धावत आहेत. पर्यायाने जनतेच्या वेळेची व पैशांचीही बचत होऊ लागली आहे. मात्र, गावाजवळ निर्माण करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचा ताबा हा अवजड वाहनांनी अवैध पार्किंगसाठी घेतल्याने प्रवासी नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीचा व अपघाताचा सामना करावा लागत आहे. तरी अशा अवैध पार्किंगवर आरटीओ तसेच वाहतूक पोलीस यंत्रणेने तात्काळ कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.
उरण हा आकारमानाने लहान तालुका असला तरी जे.एन.पी.ए. व अन्य बंदरांमुळे या तालुक्यात मोठे औद्योगीकरण होत आहे. त्यामुळे उरणच्या प्रवासी वाहतुकीच्या रस्त्यांवरूनच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणत होत होती. त्यामुळे रस्तो रस्ती वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या झाली होती. जे.एन.पी.ए. व अन्य बंदरात तसेच मालाची साठवणूक करणार्या गोदामांमध्ये येणारी वाहने वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडत असत. त्याच बरोबर रस्त्यावरून प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे, त्यामुळे वेळ व इंधनाच्या खर्चात वाढ होत होती. त्यातच बेशिस्त वाहनांमुळे जवळ जवळ सुमारे 987 निष्पाप प्रवाशी नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले.
या समस्य संदर्भात उरणकरानी वारंवार आंदोलने उभारुन आवाज उठविला होता. या आंदोलनाची दखल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेऊन तोडगा काढण्यासाठी जे.एन.पी.ए. महामार्गाचे आठ पदरी काँक्रीटकरण व रुंदीकरण करण्याचे व गावाजवळ सर्व्हिस रोड निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. यासाठी सुमारे तीन हजार कोटीचा खर्च करण्यात आला असून अशा दर्जेदार रस्त्यांचे भूमिपूजनांचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला होता.
एकंदरीत दर्जेदार वेगवान मार्गांमुळे उरणच्या विकासाला गती मिळणार आहे. मात्र उरणचे रस्ते प्रशस्त व सुसाट झाले असले तरी जनतेसाठी, प्रवाशी नागरीकांसाठी आवश्यक असणार्या सर्व्हिस रस्त्यांचा ताबा हा सध्या अवजड वाहनांनी पार्किंगसाठी घेतल्यांचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षित वाटणारे ऐसपैस रस्ते, सर्व्हिस रोड सध्या धोकादायक वाटत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख अधिकारी, जेएनपीए बंदरातील अधिकारी, आर.टी.ओ विभागाचे अधिकारी आणि वाहतूक पोलीस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्षात जे.एन.पी.ए.ने निर्माण केलेल्या ऐसपैस रस्त्याची व गावा जवळील सर्व्हिस रस्त्याची पाहणी करून वाहतूक कोंडीला तसेच अपघाताला कारणीभूत ठरणार्या अवैध पार्किंगवर कारवाईचा बडगा उगारावा, अन्यथा याविरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा मनसेचे उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत यांनी दिला आहे.