अवघ्या दहाव्या वर्षी मलेशियात पटकावले रौप्यपदक; भारताचा तिरंगा परदेशात अभिमानाने फडकवला
| चौल | प्रतिनिधी |
अवघ्या दहाव्या वर्षी समुद्राच्या लाटांवर स्वार होत उरणच्या नागावची कन्या वृतिका संदीप म्हात्रे हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. मलेशियातील लंगकावी येथे दि. 4 ते 8 ऑगस्टदरम्यान झालेल्या टेक्नो 293 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत वृतिकाने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. आशियातील विविध देशांतील अनुभवी खेळाडूंशी दोन हात करत मिळवलेले हे तिचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक ठरले आहे.
वृतिका ही यॉटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांची सदस्य असून, ती करंजा, उरण येथील नेव्हल चिल्ड्रन्स स्कूलमध्ये इयत्ता पाचवी ‘ब’मध्ये शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच समुद्राशी नाते जोडलेल्या वृतिकाने आपल्या जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. मलेशियातील लंगकावी येथील नॅशनल सेलिंग सेंटरमध्ये ही आशियाई अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. आशियातील विविध देशांतील युवा विंडसर्फिंगपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या कठीण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यू-13 मुलींच्या गटात वृतिकाने आपल्या कौशल्याची छाप पाडत रौप्यपदक मिळवले.
वृतिकाच्या या यशामागे तिचे वडील संदीप हिरा म्हात्रे यांचे मोलाचे योगदान आहे. स्वतः नौदलात कार्यरत असलेल्या संदीप म्हात्रे यांनी वृतिकाच्या प्रशिक्षणासाठी सातत्याने मेहनत घेतली. तिची आई अनिता म्हात्रे या ओएनजीसीमध्ये कार्यरत आहेत. आई-वडिलांचे प्रोत्साहन, प्रशिक्षक संदीप म्हात्रे मार्गदर्शन आणि वृतिकाची प्रचंड मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे.
रायगडचे नाव सातासमुद्रापार
उरणच्या या चिमुकल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत रायगडच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढवला आहे. वृतिकाच्या या कामगिरीमुळे रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे. टेक्नो 293 हा विशेषतः युवा खेळाडूंसाठी लोकप्रिय असलेला विंडसर्फिंगचा प्रकार असून, वाऱ्याचा वेग व दिशा, समुद्राच्या लाटा, शरीराचा समतोल आणि योग्य डावपेच यांच्या जोरावर खेळाडूला शर्यत पूर्ण करावी लागते.
वृतिकाने मिळवलेले हे पदक आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. लहान वयात तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून रौप्यपदक मिळवले, याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. तिच्या मेहनतीला योग्य दिशा देत तिला भविष्यात आणखी मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तिच्या या यशामुळे तिच्या पुढील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.
संदीप म्हात्रे,
वृतिकाचे वडील
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवता आले, याचा मला खूप आनंद आहे. मलेशियातील स्पर्धेचा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे प्रोत्साहन यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. भविष्यात आणखी चांगली कामगिरी करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे.
वृतिका म्हात्रे
