शेतकरी संघटनेची मागणी
| तळा | वार्ताहर |
यावर्षी पाऊस भरपूर प्रमाणात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने तालुक्यात शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची पेरणी व लागवड होणार आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी आवश्यक असलेल्या युरिया खतांचा तातडीने पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तळा तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तळा तालुका शेतकरी संघटनेचे सचिव कैलास पायगुडे यांनी तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यासाठी मे महिनाअखेर युरियाचा पुरवठा होणे आवश्यक असून, याबाबतीत किती टन युरिया लागणार आहे त्याचे नियोजन तातडीने करावे याबाबतीत चर्चा केली. केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तालुक्यात युरिया खताची जादा दराने विक्री होत आहे. हे कृषी विभागाच्या अधिकार्यांना माहिती असूनही त्यांचे शेतकर्यांच्या होणार्या लुटीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरीवर्गातून होत आहे. सर्वत्र युरिया खताची मागणी वाढल्याने शेतकरी हे खत मिळेल त्या ठिकाणावरून जादा दराने खरेदी करत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते, परंतु यावेळी शेतकर्यांचे नुकसान होऊ देणार नाही. युरिया खताची जास्त दराने विक्री करणार्यांवर तळा तालुका शेतकरी संघटनेचे पूर्ण लक्ष राहाणार असून, जादा दराने खत विक्री करणार्यांवर कारवाई केली पाहिजे तरच शेतकर्याची लूट बंद होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.