भातलावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

वेळ आणि मजुरांचा प्रश्न सुटला

| खांब | वार्ताहर |

सध्याच्या आधुनिक युगात शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे. अशाच परिस्थितीत पीक उत्पादन वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहीत असणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. जेणेकरून या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी त्यांच्या शेतात पीक उत्पादन वाढ होण्यास मदत मिळेल. आधुनिकतेचा ध्यास घेत रोहा तालुक्यातील सांगडे गावातील शेतकरी केशव खरिवले यांच्या सहकार्याने भूषण साळवी यांच्या शेतात भातलावणीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करीत लावणीचे काम केले आहे. त्यामुळे वेळ आणि मजुरांचा प्रश्न आपसूकच सुटला आहे.

रोह्यातील सांगडे गावचे केशव खरिवरे यांना रायगड जिल्हा परिषदेकडून कृषीनिष्ठ शेतकरी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तालुक्यात ठिकठिकाणी मशीनच्या माध्यमातून शेती लागवडीचे प्रात्यक्षिक त्यांच्याकडून दाखविण्यात येत असून, शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. एकीकडे शेती परवडत नसल्याने काही शेतकरीवर्गाने शेतीकडे पाठ फिरविली असल्याचेही पहावयास मिळत आहे. तर, दुसरीकडे शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून जास्तीचे उत्पादन कसे मिळेल यासाठीही शेतकरी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी नवनवीन बी-बियाणे व खतांचा वापर करणे, पावर टिलर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, उखळणी आदी कामे करणे, लावणी यंत्राच्या सहाय्याने लावणी करणे, कापणी यंत्राच्या सहाय्याने कापणी, झोडणी, मळणीची कामे करणे व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन त्याचाही शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर करणे आदींच्यामुळे शेती क्षेत्रातील कामे सहजसुलभ कशी होतील यासाठी शेतकरी प्रयत्नरत आहेत.

शेतकरी बांधवांनी शेती ही पारंपारिक पद्धतीने न करता त्याला आधुनिक शेतीची जोड दिली पाहिजे. कृषी विद्यापीठे व विविध कृषी संशोधन संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून, शेतीचे उत्पादन वाढवून, स्वत:चा विकास करून देशाच्या उत्पादनात हातभार लावणे आवश्यक आहे.

केशव खरिवले, कृषीनिष्ठ शेतकरी
Exit mobile version