आरोग्य विभाग लागले कामाला; पहिल्या सत्रात 3500 बालकांना डोस, वंचित बालके आणि गरोदर मातांसाठी विशेष मोहीम
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात विशेष इंद्रधनुष्य मोहीम 5.0 राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये एकूण सहाशे दोन लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेली आहेत. पहिल्या सत्रात रायगड जिल्ह्यातील साडेतीन हजार बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट रायगड जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहीम रायगड जिल्ह्यात तीन फेर्यांमध्ये होणार असून, यामध्ये पहिली फेरी 12 ऑगस्टपर्यंत, दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर तर तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी 602 विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार असून, प्रत्येक बालकाचे डिजिटल एमपीसी कार्ड तयार केले जाणार आहे.
लसीकरणापासून वंचित राहिलेली बालके आणि गरोदर मातांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राज्यात राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यातही पुढील तीन महिने ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग या ठिकाणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवमाने, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, डॉ. अशोक कटारे, डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवरे, रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे आदी उपस्थित होते. यावेळी नर्सिंग विद्यार्थ्यांनी स्तनपान व लसीकरणाविषयी पथनाट्य सादर केले. विशेष इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेमध्ये एकूण सहाशे दोन लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये दोन वर्षांवरील 1776 लाभार्थी व दोन ते पाच वर्षांमधील 638 लाभार्थ्यांना डोस देण्यात येणार आहे. यामध्ये एमआर 1 चे लाभार्थी 474, एमआर 2 चे लाभार्थी 484 आणि गरोदर महिला 370 यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना 12 ऑगस्टपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे.
मिशन इंद्रधनुष्य मोहिमेसाठी जिल्हा परिषद सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज असून जिल्ह्यातील सर्व 0 ते 2 वर्ष व 2 ते 5 वयोगटातील बालकांचे आणि गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. स्थलांतरित मजूर, लोकवस्ती, वीट भट्टी, बांधकाम मजूर, दुर्गम भाग लोकवस्ती हे भाग यासाठी प्राधान्य असणार आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणाविना वंचित राहू नये, तसेच लसीकरणाअभावी बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी आता आरोग्य विभाग मार्फत इ विन अॅप चा वापर केला जाणार आहे.
या अॅपमुळे बालकांचे लसीकरण सोपे झाले असून 0 ते 18 वयोगटातील तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना देण्यात येणार्या लसीकरणाची माहितीही एका क्लिकवर मिळणार आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता इ विन अॅप वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. या अॅप मुळे इतर जिल्हयांत किंवा राज्यांत लस घेणे शक्य होणार आहे. तसेच लसीकरण लाभार्थ्याचे आशा, एएनएम व एमपीडब्ल्यूसुद्धा पूर्व नोंदणी करू शकणार आहेत. लसीकरण केंद्रावर लसीकरणा दिवशी ही नोंदणी करता येणार आहे.