। रसायनी। वार्ताहर |
विद्यादान व प्रसारण करणारे शिक्षक आणि विद्या आत्मसात करणारे विद्यार्थी हे एकत्र आल्यावर शिक्षणाचा पाया मजबुत होतो. तसेच, शिक्षणाचा स्तर अधिक उंच होतो, असे गौरवोद्गार खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप कराड यांनी काढले आहे.
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगावचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम तर मुंबई विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी शाळेला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल उपस्थित होते. वडगाव शाळा ही मॉडेल स्कूल म्हणून नावलौकिक मिळवत आहे, या शाळेच्या विकासात अजून काही योगदान देता येत असेल तर नक्की द्यावे. राठोड गुरुजी व सर्व शिक्षक चांगले काम करत आहेत त्यांचे मनापासून कौतुक. या कामामुळे आज त्यांच्या पाठीवर शाबासकीचा वर्षाव होत आहे, असे गटविकास अधिकारी संदिप कराड म्हणाले.







