। रसायनी । वार्ताहर ।
सतत पडणार्या पावसामुळे खालापूर तालुक्यातील शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिले आहेत.
गेले चार ते पाच दिवस सतत पावसाचे थैमान सुरू आहे. तत्पूर्वी पडलेल्या पावसाने शेतकर्यांचे खुप मोठे नुकसान केले आहे. पिकलेले भात वादळ वारा आणि जोरदार पावसाने आडवे झाले आहे. हे भात चिखलात रुतून बसले आहेत, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावेळी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी जोर धरत आहे. याची माहिती खालापूर तालुका कृषी विभाग यांच्यामार्फत खालापूर तहसीलदार यांना कळविण्यात आली आहे. शेतीपीक व फळपीक नुकसानीचे पंचनामे 33 टक्केपेक्षा जास्त असणार्या शेतकर्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिले आहेत. हे पंचनामे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. सर्व मंडळ अधिकारी, कृषी सहायक, तलाठी व ग्रामपंचायत अधिकारी यांना तातडीने कळविण्यात आले आहे. अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिली.