आ. थोरवेंचे फसवे भूमिपूजन
। नेरळ/वेनगाव । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात उभ्या राहणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित भवनाच्या जागेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. समाजाच्या कार्यकर्त्यांनी जागेबाबत निर्माण झालेला संभ्रम पालिकेने दूर करावा, अशी मागणी करणारे निवेदन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना सोमवारी (दि.21) सादर केले आहे.
कर्जत शहरात उभ्या राहणार्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या जागेबाबत संभ्रम आहे. भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात आ. महेंद्र थोरवे यांनी 13 गुंठे जमिनीवर भवन राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणच्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर आणि मालमत्ता पत्रावर केवळ तीन ते चार गुंठे जागा उपलब्ध आहे. यामुळे अल्प जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन कसे उभे राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या समजाची घोर फसवणुक होत असल्याने दोन समजात वाद निर्माण करीत असून भवनाच्या जागेची दिशाभूल केली जात आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील बायोगॅस प्रकल्पाच्या 3 गुंठे जागेत कचर्याच्या ठिकाणी नको. बायोगॅस प्रकल्पाची जागा खूप गुंतागुंतीची असून सर्विस रोडमध्ये जात आहे. तसेच, या जागेवर पार्किंग झोन आहे. यामुळे 13 गुंठे जागा सांगून 3 गुंठे जागेत आंबेडकर भवन नको आहे. तसेच, भूमिपूजन केलेल्या जागेत कुठलाही प्रकारचे भवनाचे काम सुरू करू नये. या जागेला तीव्र विरोध असल्याचे निवेदन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, समाजाकडून कर्जत पालिकेला निवेदन देऊन जागेचा प्रश्न पुढे करण्यात आला आहे. यावेळी, उत्तम जाधव, सुशील जाधव, सुनील गायकवाड, विजय डाळिंबकर, संजय अभंगे, आशिष खंडागळे, रोहित जाधव, अमोल साळवी, राहुल गायकवाड, अॅड. सुरज पंडित, सुशील जाधव, राजू ढोले, प्रमोद गायकवाड, प्रशांत जाधव, रोहित सरवते, नरेश जाधव, विद्यानंद वोव्हळ, भालचंद्र गायकवाड, अक्षय निकाळजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सन 2010 साली घेण्यात आलेल्या ठरावातील मुद्रे बुद्रुकमधील 13 गुंठे जागा नगरपरिषदेच्या ताब्यात नाही. म्हणून आम्ही तो ठराव रद्द केला आहे. नगरपरिषदेच्या ताब्यात असणार्या कचर्याच्या बायोगॅस प्रकल्प शेजारी पर्यायी जागेचा ऑक्टोबर महिन्यात नव्याने ठराव घेण्यात आला आहे. ही जागा 8 गुंठे आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शासकीय कोणताच निधी नसल्याने तो कार्यक्रम नगरपरिषदेचा किंवा शासकीय नव्हता. तसेच, या जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाव्यतिरिक्त दुसर्या कोणत्याही नावाने भवनाचा ठराव घेण्यात आलेला नाही. तसेच, या जागे शेजारी असणार्या कृषी संशोधन केंद्राची काही गुंठे जागा आंबेडकर भावनासाठी मागणी करत आहोत.
– वैभव गारवे, मुख्याधिकारी, कर्जत नगरपरिषद