। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या 19 वर्षांखालील संघामध्ये कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑसी गोलंदाजांना चांगला चोप दिला. विहान मल्होत्रा आणि वैभव सूर्यवंशी यांनी दमदार खेळ करताना भारताला 13.1 षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांच्या खेळीने प्रेरित होऊन वैभवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल केला होता. तसेच, 19 वर्षांखालील कसोटीत अर्धशतक झळकावणारा तो युवा फलंदाज ठरला.
यावेळी 13 वर्षाच्या वैभवने 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या आधी नजमूल शांतोने 14 वर्षांचा असताना 2013 मध्ये श्रीलंकेविरूद्ध अर्धशतक झळकावले होते. शांतो हा सध्या बांगलादेशचा कर्णधार आहे. बिहारच्या वैभवने मागच्या वर्षी मुंबईविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ही फटकेबाजी सुरू ठेवताना 58 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि 19 वर्षांखालील कसोटीत हे भारतीयाचे वेगवान शतक ठरले आहे. तसेच, मन्जोत कार्ला (101) व शुभमन गिल (109) यांचा विक्रम त्याने मोडला आहे. या विक्रमात वैभवचा जगात दुसरा क्रमांक लागत आहे. मोईन अलीने 2005 मध्ये 56 चेंडूंत शतक झळकावले होते.