। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या सगळीकडेच संभ्रमाची स्थिती आहे. आमचा शिवसेनेसोबत (उद्धव ठाकरे) जाण्याचा विचार आहे, असे स्पष्टीकरण वंचितचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे. दोन दिवसांपूर्वी आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत दोन तास चर्चा झाली होती. त्यावरुन राजकीय तर्कवितर्क लढविले जात होते. त्यासंदर्भात खुलासा करताना आंबेडकर म्हणाले की, आम्ही त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला होता. आता युती कधी जाहीर करायची हे शिवसेनेने ठरवायचे आहे.
ही युती जोपर्यंत जाहीर होणार नाही, तोपर्यंत अनेक तर्क लावले जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत भेट होणारच आहे. मात्र प्रत्येक भेट ही राजकीय आहे, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यांनी भाजपाला सोडले तर आमच्यात राजकीय चर्चा होऊ शकते. अन्यथा नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी युतीचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. महापालिका निवडणुकीमध्ये आमची युती झालेली आहे. मात्र ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. आम्ही एकमेकांना शब्द दिला आहे. आम्ही चार भिंतीच्या आत हे शब्द दिलेले आहेत. आता ही युती कधी जाहीर करायची ते उद्धव ठाकरे यांनी ठरवायची आहे. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सोबत घ्यायचे आहे. आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ, असेही त्यांनी सांगितलेले आहे.
मी काँग्रेसला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. माझ्याएवढा काँग्रेस आणि शरद पवार यांना चांगल्या प्रकारे ओळखणारा राज्यात दुसरा नेता नाही. ते तुम्हाला फसवतील. शिवसेनेने थांबू नये, असा संदेश आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेला आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.