वरवठणे कोंड स्वप्नातील गाव म्हणून घोषित

। म्हसळा । प्रतिनिधी ।

स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये अनेक विकासाची वेगवेगळी कामे होत आहेत. दोन वर्ष आधी स्वदेस फाउंडेशनने गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वप्नातील गाव या स्पर्धेचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेमध्ये अनेक गावांनी हिरारीने भाग घेतला होता. यामध्ये म्हसळा तालुक्यातील वरवठणे कोंड गावानेही भाग घेतला होता. यावेळी वरवठणे कोंड गावाने नुकताच मोठ्या उत्साहात खालू बाजा, लेझीम नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं गाव स्वदेस फाऊंडेशन तर्फे स्वप्नातील गाव म्हणून जाहीर केले. या कार्यक्रमासाठी गाव विकास समितीचे सदस्य, ग्रामस्थ व स्वदेस फाऊंडेशन तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते .

गाव विकास समितीने उपस्थित असलेल्या मान्यवरांचे यथोचित सन्मान करून आपल्या गावाची झालेली प्रगती व त्या साठी लाभलेले स्वदेस, शासन आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य याचा प्रवास सांगितला. आपल्या आराखड्यातील 80% कामे पूर्ण केलेली असून पुढील प्रगती अशीच सुरू ठेवणार असे सांगितले. या सगळ्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असल्याचे दिसून आले. आपल्या पाण्याची भविष्यातील चिंता दूर व्हावी या साठी गावाने स्वदेसने मार्गदर्शन केल्याप्रमाणे स्वजल स्पर्धे अंतर्गत असलेली 78% कामे पूर्ण केली आहेत. यामध्ये बंधारा, समतल चर, स्रोत स्वछता, रंगरंगोटी, पाणी तपासणी, परसबाग लागवड इत्यादी कामे झाली आहेत. या कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक प्रसाद पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक शिवतेज ढऊळ, प्रशांती मिकायला, रोहिणी जोशी, कौस्तुभ कांबळे, चेतन सवादकर, विवेक गंधाले, वरवठणे कोंड गाव विकास समितीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version