| अलिबाग | प्रतिनिधी |
जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने अलिबागमध्ये शनिवारी (दि. 09) सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन कमिटी अलिबाग व मुरूड तालुक्याच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती जी. जी मेंगाळ आणि सुरेश नाईक यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये दरवर्षी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो.आदिवासी समाजाच्या हक्काचे आणि संरक्षण आणि जागरुकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने शनिवारी अलिबागमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपारिक पेहराव करून आदिवासी नृत्यांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता अलिबागमधील रायगड बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बालाजी नाका, महावीर चौक, एसटी स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शेतकरी भवन अशी ही रॅली कुरुळ येथील क्षात्रैक्य सभागृहापर्यंत जाणार आहे. या सभागृहाच्या येथे या रॅलीची सांगता होणार आहे. त्यानंतर शिधापत्रिका, शासनाच्या योजनाची माहिती वेगवेगळे दाखले वाटपाचा कार्यक्रम या सभागृहात होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, आदिवासी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, अलिबाग पुरवठा निरीक्षक हर्षल देशमुख आदी मान्यवरांसह सुरेश नाईक, जी.जी. मेंगाळ उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606