मिरवणुकांसह प्रतिमा, पुतळे पुजन आणि इतर कार्यक्रमांचा जल्लोष
| अलिबाग | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांची शुक्रवारी (दि. 19) जयंती आहे. जिल्ह्यामध्ये 238 ठिकाणी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मिरवणुका, व ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष असणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या माध्यमातून होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याचा भक्कम पाया रचला. त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन जयंती उत्सव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी साजरी केली जाते. दरवर्षी जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांची शुक्रवारी (दि.19) जयंती आहे. महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न सामाजिक, सांस्कृतिकांच्या माध्यमातून केला जाणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 238 ठिकाणी जयंती साजरी केली जाणार आहे. अलिबागसह काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व काही ठिकाणी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले जाणार आहे. हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यासाठी शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. मावळा प्रतिष्ठान सह वेगवेगळ्या संस्था, संघटना व शिवप्रेमींच्या वतीने जिल्हयामध्ये ठिकठिकाणी मिरवणुक, बाईक रॅली व अन्य रॅलीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये 89 ठिकाणी रॅली आणि मिरवणुका होणार आहेत. अलिबागमध्ये गाज फाऊंडेशन आणि मनस्वीनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रताप गड हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये अन्य ठिकाणीदेखील सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. एकूण 13 ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख सर्व स्तरातील घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त होणारे कार्यक्रम आनंदात व उत्साहात साजरे व्हावे, यासाठी रायगड पोलिसांनीदेखील कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जिल्ह्यामध्ये 632 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवला आहे. त्यामध्ये 76 पोलीस अधिकारी, 488 पोलीस अंमलदार, 68 वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच आरसीपीचे तीन पथकांचा समावेश असणार आहे.
