। रायगड । वार्ताहर ।
राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.
छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1 लाखाची थेट कर्ज योजना नियमित परतफेड करणार्या लाभार्थ्यांना व्याज नाही व 20 टक्के बीज भांडवल योजना. तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज योजना परतावा योजना रु.10 लाखांपर्यंत गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लाख ते 50 लाख पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल योजना (भौतिक उद्दिष्ट 49) या योजनांचे अर्ज शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय महामंडळाच्या रायगड जिल्हा कार्यालयात स:शुल्क उपलब्ध आहेत.
रु.1 लाख थेट कर्ज योजना-
सिबिल क्रेडिट स्कोर किमान 500 असलेल्या लाभार्थ्यांना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परत फेडीचा कालावधी 4 वर्षे आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा 18 ते 55 वर्षे आहे. कर्जाची नियमित परतफेड करणार्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्प्ता 2 हजार 85 रुपये आहे. 20 टक्के बीज भांडवल योजना- कर्जाची उच्चतम मर्यादा रु. 5 लाख पर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा वय 18 ते 50 वर्षे आहे. बँकेमार्फत लाभार्थ्यांना 75 टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये लाभार्थ्यांचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के महामंडळाच्या कर्ज रकमेवर व्याजाचा दर 6 टक्के असते.
या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे :-
पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मूळ दाखला. (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख), सक्षम अधिकार्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (इ.मा.व.), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र शिधापत्रिकेची झेरॉक्स, सिबिल क्रेडिट रिपोर्ट थेट कर्ज योजनेकरिता (स्कोर किमान 500 असावा), स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल किंवा रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/ जन्मतारखेचा दाखला. भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इत्यादी कागदपत्रे लागतात.







