अहिल्यानगरात पुरोगामी उपक्रम
| मुंबई | प्रतिनिधी |
अहिल्यानगर शहरातील नगर-कल्याण रोडवर असलेल्या वर्धमान महावीर कॅम्पसजवळील वृंदावन कॉलनी येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून, याच परिसरात एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या या भागात वृक्षारोपण करून फाऊंडेशनने समाजातील वंचित, उपेक्षित आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकल मातांना सन्मानाचे स्थान दिले, तसेच या परिसरात पर्यावरण संवर्धनाचा एक नवा आणि सकारात्मक संदेश पोहोचवला. या उपक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रांतील अनेक प्रमुख मान्यवरांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली.
परंपरा आणि आधुनिक सामाजिक जाणीव यांची सांगड घालत स्त्री सन्मानाला नवा आयाम देण्याचा हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. समाजात अनेकदा एकल माता भगिनींना संघर्ष, उपेक्षा आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागते; मात्र त्यांना केवळ सहानुभूतीची नव्हे तर सन्मानाची गरज आहे, या विचारातून या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली.
या पुरोगामी पाऊलामुळे केवळ वृक्षारोपणच झाले नाही, तर सामाजिक विषमतेच्या भिंती ओलांडून अनाथ आणि एकाकी लढणाऱ्या मातांना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न यशस्वी झाला. पारंपारिक धार्मिक सणांना अशा प्रकारे समाजोपयोगी व पर्यावरणाभिमुख वळण दिल्यास समाजाची वैचारिक प्रगती वेगाने होऊ शकते, हेच या उपक्रमाने दाखवून दिले आहे.
यावेळी वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष संवर्धनाची गरज अहूर्रेखित करत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
वटपौर्णिमा हा सण केवळ परंपरा म्हणून साजरा करण्यापेक्षा त्याला सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जोड देणे आवश्यक आहे. समाजातील एकल माता भगिनींना सन्मान देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– प्रशांत पाटील शेळके, अध्यक्ष,
कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाऊंडेशन






