अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी, पोलीसाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न
| पाली | वार्ताहर |
अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरवस्था झाली आहे. धीम्या गतीने चालू असलेले महामार्गाचे काम हे नागरिकांना व वाहनचालकांना डोके दुखी बनली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सर्वच सत्रातून दबाव वाढत आहे. मात्र राज्य शासनाला काही जाग आली असल्याचे दिसून येत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी महामार्गाचा तीन वेळा पाहणी दौरा केला. गणपती सणापूर्वी पळस्पे ते इंदापूर दरम्यानची एकेरी मार्गिका पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गणपती सण तोंडावर आला तरी काही ठिकाणची परिस्थिती जैसे थे आहे.
राज्य शासनाकडून यावर तोडगा काढण्यात आला असून गणपती सणात महामार्गावरून वाहतूक कोंडी होऊ नये व तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेला रस्ता गणपतीत टिकावा यासाठी एक महिना अगोदर मुंबई गोवा महामार्गावरची अवजड वाहतूक गणपती सणापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
कोकणाच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक वाकण नाक्यावरून पालीमार्गे खोपोलीकडे वळविण्यात आली आहे. याचा परिणाम पाली खोपोली महामार्गाच्या वाहतुकीवर होत आहे. पाली खोपोली वाकण या राज्य महामार्गाचे काम जरी पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी रस्ता हा निमुळता आहे. वाकण ते पाली, पेडली ते परळी, शेमडी ते मिरकूटवाडी या ठिकाणी डांबरीकरण असून तांत्रिक बाबींमुळे रस्त्याचे काम न झाल्याने रस्ता निमुळत्या स्वरूपाचा आहे. अशा ठिकाणी सध्या पाली मार्गे धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे मोठ मोठे मालवाहू कंटेनर, निमुळत्या रस्ता व नागमोडी वळणांमुळे पलटी होऊन वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत.
सध्या कोकणात जाण्यासाठी चाकरमानी पाली खोपोली मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. पाली खोपोली महामार्गावर परळी,पेडली सारख्या छोट्या बाजारपेठा असून त्याठिकाणी रस्ता देखील निमुळता आहे. त्यामुळे ऐन गणपती सणात पाली खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीचा सामना चाकरमानी व वाहनचालकांना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. पोलीस वाहतूक शाखेकडून देखील वाहतूक सुरळीत कशी होईल त्याकरिता कोणत्या उपाययोजना करण्यात येतील हे बघणं देखील महत्वाचे ठरणार आहे.