गोविंदाअभावी विक्रेत्यांची हंडी रिकामीच

वाढत्या निर्बंधाने दुकानदार निराश
| अलिबाग | सायली पाटील |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी अर्थात मंगळवारी(31 ऑगस्ट) दहीहंडीचा सोहळा साधेपणाने साजरा केला जाणार आहे. यामुळे दरवर्षी दहीहंडी फोडण्यासाठी लागणार्‍या हंड्या विकत घेण्याकरिता गोविंदांची लगबग कुठेच दिसून आली नाही. याचा मोठा फटका विक्रेत्यांना बसला आहे. दहीहंडीचा सण मंगळवारी साजरा होत असताना अद्यापही बाजारपेठांतील दुकांनांमध्ये ग्राहकांची पावले खरेदीसाठी दुकानांत वळलेली नाहीत. दहीहंडी म्हटलं की तुफान गर्दी ही आलीच त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता खुप मोठ्या संख्येने एकत्र येऊन साजरा होणारा हा सण कोरोनामुळे बंदच ठेवण्यात आला आहे. पण या सर्व निर्बंधांमुळे बाजारपेठांतील दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.

यावर्षी निदान 50 टक्के तरी धंदा होईल अशी आशा दुकानदारांना वाटत होती. गोविंदाचा सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये विविध रंगाच्या, आकाराच्या हंड्या विक्रीसाठी आल्या आहेत. परंतु या हंड्या घेण्यासाठी मात्र अजूनही युवकांची व गोविंदा पथकांची पावलं दुकानांकडे वळलेली दिसत नाहीत. त्यामुळे यंदा थोडातरी धंदा होईल अशा अपेक्षेवर असलेले दुकानदार मात्र आता निराश झाले आहेत. राज्य सरकारने गोविंदा होणार नसल्याचे जाहीर केले असले तरी कोरोनाची घटती संख्याा पाहता स्थानिक पातळीवर गोविंदा खेळण्यास काही अटींवर परवानगी मिळेल अशा चर्चेसोबत युवक सध्या दहीहंडीची तयारी करत आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला किंवा दुकानांच्या बाहेर बसून हंड्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसत आहेत.

हंड्यांचे भाव घसरले
ग्राहक हंडीचा भाव करून 100 रूपयांची हंडी 70-80 रूपयांना नेत आहेत. परंतु काहीच धंदा होत नसल्याने या ग्राहक करत असलेल्या भावांसोबतच तडजोड करीत असल्याचे दुकानदार सांगत आहेत. गोविंदासाठी लागणाय्रा नक्षीदार हंड्या, रंग, टी-शर्ट, गोंविदाचा उल्लेख असलेल्या रिबीन, हँड बेल्ट दुकानांबाहेर विक्रीसाठी लटकताना दिसत आहेत. परंतु खरेदीसाठी ग्राहक येतच नसल्याने व्यावसाईक व दुकानदार मात्र चिंतेत आहेत.

Exit mobile version