। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये तीन वर्षांपूर्वी जी आघाडी झाली होती शेकापक्ष विरुद्ध सर्व पक्ष ती तीन वर्षांनंतर देखील कायम आहे. आज राज्यामध्ये वेगळे राजकारण असेल पण अलिबागमध्ये आजही सर्व पक्षविरुद्ध शेकापक्ष अशी आघाडी असताना सत्तेचा दुरुपयोग करुन साम दाम दंड भेद याचा वापर करुन शेतकरी कामगार पक्षाचा निसटता पराभव झाला असल्याचे मत व्यक्त करतानाच बचेेंगे तो और भी लढेंगे असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामपंचायतीच्या निकालाच्या पार्श्वभुमीवर आपले मत व्यक्त करताना पंडित पाटील म्हणाले की, आज जरी वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये आमचा पराभव झाला असेल तरी आमचा पराभव 90 मतांनी झालेला आहे. तरी कार्यकर्त्यांनी खचून जाता कामा नये. आजही पक्षाला मानणारे लोक आहेत. शेतकरी कामगार पक्ष पराभवाने कधीच खचत नाही. बचेंगे तो और भी लढेंगे.
आज सर्व मतभेद बाजूला ठेवून वेगवेगळ्या विचारांची लोकं एका पक्षाला पाडण्यासाठी एकत्र येतात त्यामुळे हा पराभव झाला आहे. मात्र दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये आमचेच सर्वाधिक सदस्य निवडून गेले आहेत. सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा.
आज आमचा आमदार नाही. पक्ष अडचणीत आहे. असे असताना देखील शेकापक्षाला पराभव करण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा या सगळ्या विविध विचारांच्या पक्षांना एकत्र यावे लागले. तरी देखील फार मोठा विजय संपादन करता आला नाही. आमचा झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. शेकापक्ष पराभवाने खचणारा पक्ष नाही. पंडित पाटील यांचा पराभव करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र यावे लागले. तीच आघाडी आजपण अलिबाग तालुक्यात कायम आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन सरकारी यंत्रणेचा वापर करुन आमचा पराभव झाला आहे. निश्चितच आगामी काळामध्ये या पराभवाचा उत्तर दिले जाईल असेही ते म्हणाले.