। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते रिंगणात आहेत. त्यांना प्रचारादरम्यान जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अनंत गीते यांचा विजय हा निश्चितच असणार, असा विश्वास शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केला. आ. पाटील पुढे म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेतकरी कामगार पक्षाने मदत केली. त्यामुळे त्यांचा विजय झाला. लोकशाही अबाधित ठेवण्याबरोबरच संविधान वाचविण्यासाठी ही लढाई आहे. त्यामुळे या निवडणुकीत यश नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आ. जयंत पाटील यांनी पेझारी येथील नाना पाटील हायस्कूलच्या केंद्रात जाऊन सकाळी मतदानाचा हक्क सकाळी बजावला. यावेळी त्यांच्यासमवेत शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील यांनी पेझारी येथील मतदान केंद्रात मतदान केले. तसेच अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अॅड. मानसी म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग शहरातील नगरपरिषदेच्या शाळेत मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, अनिल चोपडा, अॅड. गौतम पाटील आदींसह अनेकांनी मतदान केले. जिल्ह्यातील तालुका चिटणीस, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायतीचे माजी पदाधिकारी, सदस्य, तसेच विद्यमान पदाधिकारी यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.
श्रमशक्तीच जिंकणार- माजी आ. पंडित पाटील रायगड लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक श्रमशक्ती विरूद्ध धनशक्ती अशी आहे. वेगवेगळे आमिष दाखवून मतदारांना भुरळ पाडण्याचे विरोधकांनी काम केले आहे. रायगडचे मतदार कोणत्याही आमिषाला बळी न पडता निष्ठावान उमेदवारांना प्रामाणिकपणे मतदान करतील, तसेच श्रमशक्तीच जिंकणार, असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला.