विहूर गुरचरण जमीन प्रकरण;अद्यापही गुन्हा दाखल नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुरुड येथील विहूर गुरचरण जमीन सध्या वादाच्या भोवर्‍यात आहे. या विवादित जमीनीबाबत महसूल व पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतीची आजपर्यंत कोणतीही बाजू ऐकून घेतली नाही. गुरचरण जमीनचा सर्व्हे न.20/1 बदलून तयार केलेला विवादित गट न.111 वरील खरेदी करणारा सहहिस्सेदार भूमाफिया तैजून निसार हसोन्जी यांनी आगळी वेगळी चाल करून जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी सर्व महसूल व पोलीस प्रशासनास वेठीस धरले.

त्यांनी मोजणी प्रकरण सादर करताना मयत अब्दुलकरीम मोदी व परदेशात राहणारे इतर सहहिस्सेदार यांची स्वतः खोटी सही करून मोजणी अर्ज सादर केला. हे माहिती अधिकारातील प्राप्त पत्रात स्पष्ट आहे. यालाच अनुसरून ग्रामपंचायतीने वारंवार जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, भूमिअभिलेख मुरुड व अलिबाग यांना लेखी तक्रार दिली होती; परंतू नवाब व भूमाफिया यांना आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष केले.

चौकशी व अहवालाच्या नावे वेळ काढून या खोट्या अर्जाद्वारे सर्व हरकतीला डावलून भूमी अभिलेख कार्यालयाने बेकायदेशीरपणे पोटहिस्सा नकाशा तयार करून दिला. खोट्या सहीचे प्रकरण असताना देखील मोजणी अधिकृत कशी? ती रद्द का गेली नाही? तैजून निसार हसोन्जी विरुद्ध पोलीस कारवाई का नाही? या प्रश्‍नाला पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड,अधीक्षक भूमिअभिलेख या सर्वांनी बगल देऊन खोट्या नकाशाच्या आधारे तैजूनला जमीनीचा नियमबाह्य ताबा घेण्यासाठी सर्व महसूल व पोलीस यंत्रणेनी चालढकल करून पोलीस संरक्षण देण्यास मदत केली. ग्रामपंचायतच्या हक्क अधिकाराला धक्का लागत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांना ग्रामस्थांनी अवगत करून देखील त्यांनी या गुरचरण जमीन प्रकरणाची दखल का घेतली नाही. स्थानिक आमदाराने या खोट्या सहीच्या मोजणी प्रकरणाला लेखी शिफारस का दिली या बाबत जनता नक्कीच जाब विचारणार आहे.

Exit mobile version