गटविकास अधिकारी संदीप कराड यांचे प्रतिपादन
| रसायनी | वार्ताहर |
गावच्या सुख-दुःखात, गावच्या विकासात ग्रामविकास हा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असल्याने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचारी यांचे सर्व ठिकाणी योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे सर्व गावची लाईफलाईन आहेत, ही लाईफलाईन थांबता कामा नये, असे आवाहन खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी केले आहे.
19 जुलै रोजी इर्शाळवाडीची दुर्दैवी घटना घडली. यात 84 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेनंतर तेथील मदत व पुनर्वसन कार्यात ग्रामविकास विभागाचा महत्त्वाचा वाटा होतो. यावेळी खालापूर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे, अशी जाणीव ग्रामसेवक संघटना डीएन 136 यांना झाल्याने ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान गटविकास अधिकारी संदीप कराड व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सगविअ. राजपूत, गटशिक्षण अधिकारी चोरमोळे, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, महादेव शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, कोकण सचिव प्रमोद पाटील, रायगड कार्याध्यक्ष संतोष पवार, तालुका सचिव अजय फोफेरकर यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत व पंचायत समितीचे अधिकार, कर्मचारी उपस्थित होते.