गावागावात मोर्चेबांधणीला सुरुवात

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील काकळघर, कोर्लई, वेळास्ते, तेलवडे व वावडुंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर गावागावात मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. वैयक्तिक गाठीभेटी तसेच मित्रमंडळाच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यास सुरू झालेली चुरस, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहिलेला कमी कालावधी यामुळे इच्छुकांची कसरत होताना दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पक्ष चिन्हावर जरी नसली तरी पक्षाचा आधार प्रत्येक इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचा आधार घेण्याच्या चढाओढीत असताना पक्षश्रेष्ठींची मात्र दमछाक होताना दिसत असल्याची चर्चा आहे. जवळपास सर्वच पक्षाच्या वरिष्ठांकडून गावात दांडगा जनसंपर्क, सामाजिक कार्यात सहभाग, वैयक्तिक पातळीवर जनतेशी असलेले संबंध व पूर्वी काम केलेले, अनुभवी तसेच शक्यतो कधी पराभूत नसलेल्या उमेदवारांबाबत सकारात्मक राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. असे असूनही इच्छुक उमेदवार हे गावातील प्रत्येक घराघरात पोहोचत असून, आपले मित्र मंडळी, पाहुणे, हितचिंतक यांच्या माध्यमातून आपापली मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अत्यंत कमी कालावधी हातात असल्याने इच्छुक उमेदवारांची निवडणूक नियोजन, कागदपत्रे, वैयक्तिक भेटी, प्रत्येक घरात पोहोचणे आदी गोष्टींसाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र तालुक्यातील पाच गावांत दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 28 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज दाखल केले जाणार आहेत.

Exit mobile version