नऊ ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ संतप्त
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कर्जत आणि माथेरान नगरपरिषद निवडणूक असल्याने लावलेल्या आचारसंहितेमुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरम्यान, शहरी भागाच्या लगतची गावे असल्याने राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत तालुक्यात कर्जत नगरपरिषद आणि माथेरान नगरपरिषदेमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या त्या शहरात राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या शहराच्या बाजूला असलेल्या किरवली, हालिवली, शिरसे, वेणगाव आणि तिवरे या ग्रामपंचायती आहेत. त्या ग्रामपंचायतीमध्ये कर्जत नगरपरिषदेची आचारसंहिता लागू झाली आहे. तर माथेरान नगरपरिषद असलेली नेरळ, दामत, माणगाव तर्फे वरेडी, ममदापूर या ग्रामपंचायती असल्याने त्या सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामीण भागातील आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे काम कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी पत्रक काढून केले आहे. मात्र, नगरपरिषद निवडणुकीची आचारसंहिता ग्रामीण भागासाठी लावण्यात आल्याने संतापाची भावना या सर्व नऊ ग्रामपंचायतींमध्ये दिसून येत आहे.
आमच्या आदिवासी भागातील विकासकामे रोखून धरण्यासाठी ही आचारसंहिता लागू केली असल्याचे आम्हाला वाटत आहे.
सचिन गायकवाड,
ग्रामस्थ आसल
आमचे गाव हे माथेरान या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार समजले जाते. मात्र, त्यामुळे माथेरान मध्ये निवडणूक असेल तर नेरळ मध्ये आचारसंहिता लावण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा उद्देश समजून येत नाही. दुसरीकडे नेरळ मध्ये आचारसंहिता लावणार आहेत तर आमच्या गावात नगरपरिषद होण्यासाठी आम्ही दहा वर्षे मागणी करून या ठिकाणी नगरपरिषद केली जात नाही, मात्र माथेरानमध्ये निवडणूक असताना आचारसंहिता लावली जाते हे दुर्दैवी आहे.
गोरख शेप,
ग्रामस्थ नेरळ
