| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील वाघोशी ग्रामपंचायतमध्ये माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून पत्रकार निवास सोनावळे यांनी सन 2018ते 2021 पर्यंत ग्राम पंचायतीच्या हद्दीतील दलीत वस्तीत झालेल्या कामांची यादी मागिवली होती. परंतु सबंधित ग्रामसेवकांनी या कालावधीत माहितीच्या अधिकाराच्या अर्जात दलित वस्तीत कोणतीही कामे झाली नसल्याचे लेखी लिहून दिले आहे.
वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील भेरव तेथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय मोरे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता त्यांना या कालावधीत दलीत वस्तीत कामे झाली असल्याचे लेखी पत्रक ग्रामसेवकांनी त्यांना दिले आहे. ग्रामसेवकांनी सामाजिक कार्यकर्ते मोरे यांना दिलेल्या लेखी पत्रकानुसार निवास सोनावळे यांना चुकीची माहिती दिली असल्याचे सिद्ध होत असल्यामुळे निवास सोनावळे यांनी या संबंधी चौकशी करण्यासाठी पंचायत समितीकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.
दरम्यान सोनावळे यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकाराला संबंधित ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली असून या ग्रामसेवकांना निलंबित केलेच पाहिजे अशी मागणी सोनावळे यांनी केली आहे. संबंधित ग्रामसेवकांना निलंबित न केल्यास दलित वस्तीतील रहिवासी तीव्र जनआंदोल छेडतील असाही इशारा सोनावळे यांनी एका प्रसिद्ध पत्रका मार्फत दिला आहे.
आपण केलेल्या तक्रार अर्जाची लवकरात लवकर चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-विजय यादव, गटविकास अधिकारी पाली सुधागड