नेरळमध्ये शासकीय नियमांची पायमल्ली

महसूल विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष?

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या कडेला हिल रॉक नावाचे रिसॉर्ट आहे. वाणिज्य वापर करणाऱ्या कोणत्याही बांधकामासाठी शासनाच्या नगररचना विभागाकडून बिनशेती जमीन असावी लागते. मात्र, अनेक बंगले आणि इमारती तसेच स्विमिंग पूल उभारणाऱ्या हिल रॉक रिसॉर्टची जमीन आजही बिनशेतीमध्ये रूपांतरित झालेली नाही. या बांधकाम विषयी ग्रामपंचायतमध्ये अनधिकृत बांधकाम अशी नोंद असून किरकोळ घरपट्टी संबंधित जमीन मालक भरत आहे. त्यामुळे अशा वाणिज्य वापर करणाऱ्या बांधकामांवर महसूल विभाग कारवाई करणार आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर नेरळमधील जिते गावच्या हद्दीत हिल रॉक रिसॉर्ट उभे आहे. या रिसॉर्टच्या उभारणीसाठी जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतर होणे आवश्यक असते. त्यानंतर बांधकाम करून त्या इमारतींचा वापर वाणिज्य स्वरूपात करता येतो. त्यात हिल रॉक हे रिसॉर्ट उभ्या असलेल्या सर्व्हे नंबर 82 मधील कोणतेही क्षेत्र हे बिनशेती म्हणून मान्यता दिलेले नाही. नगररचना विभागाकडे या भागातील शेतजमीन मालकांनी मागणी केली आहे. मात्र, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून या जमीन मालकांना ना हरकत परवाना मिळालेला नाही. त्याचा परिणाम रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून बिनशेती दाखला देण्यात आलेले नाहीत. मात्र, तरीदेखील हिल रॉक सारखे रिसॉर्ट येथील पाच एकर जमिनीवर उभे राहिले आहे. जमीन बिनशेती केली नसताना तेथे विहिरी खोदण्यात आल्या असून या जमीन मालकावर कोणाचा वरदहस्त आहे, याची चर्चा सुरू आहे.

कर्जत-नेरळ रस्त्यावरील हिल रॉक रिसॉर्ट संबंधी तक्रारी आमच्या कार्यालयाकडे आल्या असून, नेरळ मंडळ अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

डॉ. धनंजय जाधव
तहसीलदार

Exit mobile version