| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील वखार नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि कच कॅसल ते गुलिस्तान बंगला या रस्त्याचे धूळविरहित रस्त्यात रूपांतर येणार आहे. मात्र, या मंजूर रस्त्याचे बांधकाम केले जात नसल्याने माथेरानमधील वन ट्री हिल रहिवाशी संघ शुक्रवारी पालिकेबाहेर आंदोलन करणार आहे. दरम्यान, ठिय्या आंदोलनानंतरदेखील या रस्त्यांचे बांधकाम सुरू झाले नाही तर 8 मार्च रोजी महिलादिनी माथेरानमधील वन ट्री हिल भागातील महिला सामूहिक उपोषणाला बसणार आहेत.
माथेरानमधील कच कॅसल ते गुलिस्तानपर्यंतचा रोड त्वरित क्ले पेव्हर ब्लॉकने पूर्ण करण्याबाबत वन ट्री हिल रहिवाशी संघ यांनी 27 जानेवारी रोजी आपणास कच कॅसल ते गुलिस्तानपर्यंतचा रोड लवकरात लवकर क्ले पेव्हर ब्लॉकने पूर्ण करावा यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर त्या निवेदनावर कार्यवाही करण्यासाठी पालिकेने पंधरा दिवसात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात वन ट्री हिल रहिवासी संघाच्या निवेदनावर पालिकेने कोणतीही कार्यवाही आजतागात केलेली नाही. आजही सदर रस्त्याचा अर्धा भाग खडी, सिमेंट, पेव्हर ब्लॉक, रेती यांनी बंद असून, उरलेल्या अर्ध्या रस्त्यावरून मालाचे घोडे, प्रवासी घोडे, विद्यार्थी, रिक्षा आणि माणसे यांची सतत ये-जा सुरू असते. यामुळे मागील आठवड्यातच रिक्षाचा अपघात होता होता वाचला. तरीदेखील अजूनपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून बांधकाम साहित्य पडले आहे आणि तसे असतानादेखील रस्त्याचे काम पालिकेने सुरू केले नाही.
त्यामुळे वन ट्री हिल विभागातील रहिवासी शुक्रवार, (दि.24) सकाळी ठिक 11 वाजता माथेरान गिरिस्थान नगरपरिषद कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषणास बसणार आहोत. सदर काम माथेरान अखत्यारीतील असूनही आपण हे काम गेल्या मे 2022 पासून प्रलंबित ठेवलेले आहे. त्याचा नाहक त्रास आम्हाला वन ट्री हिल विभागातील रहिवासी, शालेय विद्यार्थी, पर्यटक यांना होत आहे. या लाक्षणिक उपोषणानंतर मार्ग निघाला नाही तर 8 मार्च जागतिक महिलादिनी वन ट्री हिल भागातील महिला सामूहिक उपोषणाला बसणार आहेत.