धोनी दुसर्या, तर तेंडुलकर तिसर्या स्थानी
। मुंबई । प्रतिनिधी ।
भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय आणि फॉलो केला जाणारा खेळ आहे. क्रिकेटप्रमाणेच चाहत्यांमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचेही तितकेच वेड आहे. क्रिकेटपटू हे क्रिकेट आणि जाहिरातींमधून मोठी कमाई करत असतात. त्याचबरोबर आयपीएल आणि इतर विविध लीग सामन्यांमुळे मोठी कमाई होते. यासह बक्कळ कमाई करणारे खेळाडू कर किती भरतात हा देखील एक उत्सुकतेचा मुद्दा आहे. फॉर्च्यून इंडियाच्या यादीनुसार 2023-24 मध्ये सर्वाधिक कर भरणार्या यादीत विराट अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ धोनी आणि तेंडुलकरचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
भारताचा रन मशीन विराट कोहलीने सर्वाधिक तब्बल 66 कोटी रुपयांचा कर भरला आहे. विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न 1900 कोटींपेक्षा जास्त आहे. तर 2023-24 मध्ये कोहलीने 66 कोटी रुपयांचा कर भरला आहे. जो एखाद्या क्रिकेटपटूने भरलेला सर्वाधिक कर आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 2023-24 मध्ये 38 कोटी रुपयांचा कर भरला आहे. धोनी या वर्षी सर्वाधिक कर भरणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा तिसरा सर्वाधिक कर भरणार भारतीय क्रिकेटपटू आहे.
सचिनची एकूण संपत्ती 1436 कोटी रुपये आहे. तर 2023-24 मध्ये सचिन तेंडुलकरने 28 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर या यादीत सौरव गांगुली चौथ्या स्थानी असून त्याने 2023-24 साठी 23 कोटी कर भरला आहे, तर हार्दिक पंड्याने 13 कोटी कर भरला आहे.
भारतीय सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक कर भरण्याच्या बाबतीत अनुक्रमे शाहरुख खान, तामिळ अभिनेता विजय, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यादीत पहिल्या ते चौथ्या स्थानी आहेत. शाहरुखने 92 कोटी, विजयने 80 कोटी, सलमानने 75 कोटी आणि अमिताभ बच्चन यांनी 71 कोटींचा कर भरला आहे.