। कर्जत । प्रतिनिधी ।
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सर्वेक्षण समितीने कर्जत एसटी आगाराला भेट दिली. यावेळी त्यांनी तब्बल दोन तास सर्व परिसराची पाहणी केली. तसेच, कार्यालयीन कागदपत्रांची देखील तपासणी केली आहे. समितीने कर्जत आगाराच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून अधिक चांगले आगार होण्यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
दुपारी दीडच्या सुमारास ठाणे जिल्ह्याचे विभागीय वाहतूक अधिक्षक रमेश बांदल यांच्या अध्यक्षतेखालील सर्वेक्षण समिती कर्जत एसटी आगारामध्ये आली. विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी कृष्णा बन, कोंकण एसटीप्रेमी ग्रुप सदस्य परहान होडेकर, पत्रकार विजय मांडे यांचा या समितीमध्ये समावेश होता. सहाय्यक वाहतुक निरिक्षक महादेव पालवे, वाहतुक नियंत्रक दीपक देशमुख यांच्या समवेत संपूर्ण आगार परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेबाबत चांगला अभिप्राय दिला. तसेच, संपूर्ण आगार परिसरातील स्वच्छता, प्रवासी निवारा, सीएनजी पंपाची व्यवस्था, कार्यालयातील कामामध्ये वेगळ्या प्रकारच्या मांडणीबद्दल समाधान व्यक्त केले.