। अलिबाग । वार्ताहर ।
बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी प्रगती करावी व त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना रोजगार मिळावा यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिला बचत गट फेडरेशन यांच्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अलिबाग शाखेजवळ महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शन केंद्राचा शुभारंभही चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बचत गटांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिला बचतगट फेडरेशन यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता जे व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जातेत्यामध्ये वस्तूंच्या उत्पादनापासून ते डिजिटल मार्केटिंग पर्यंत विविध विषय शिकविले जातात. शिवाय याच महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी एक नवीन हक्काची बाजारपेठ मिळावी याकरीता बँकेच्या अलिबाग शाखेजवळ महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकरी प्रदीप नाईक ,फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.